
आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा शहरातील कचरा व्यवस्थापन व सुशोभीकरण प्रकल्प नियोजना संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक VVIP गेस्ट हाऊस, पुणे येथे पार पडली.
बैठकीत कचरा व्यवस्थापनासाठी प्रस्तावित बायो-CNG प्रकल्प उभारणीचा आराखडा सादर करण्यात आला.
सध्या लोणावळा शहरात दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यात ओला कचरा, सुका कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा आणि प्लास्टिक यांचे योग्य विभाजन करणे आवश्यक आहे. जुन्या डंपिंग यार्डमध्ये सुमारे १,००,००० मेट्रिक टन कचरा साचल्यामुळे गळतीचे पाणी (leachate), दुर्गंधी आणि पर्यटन प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे.
हिल-स्टेशन व पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा शहरासाठी वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन (SWM) करणे हे आरोग्य आणि शहराच्या प्रतिमेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दृष्टिकोन :-
– लोणावळा – खंडाळा शहराला स्वच्छ पर्यटन शहर बनविणे
– आधुनिक प्रक्रिया केंद्र उभारणे
– जुन्या डंपिंग यार्डचे उच्चाटन करणे
– १००% दैनंदिन कचऱ्याचे प्रक्रिया करून उघड्यावर टाकणे थांबवणे
– ‘लोणावळा – खंडाळा’ महाराष्ट्रातील कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श हिल-टाउन म्हणून विकसित करणे
यासाठी मा. उपमुख्यमंत्री महोदयांकडून हिरवा कंदील मिळाला असून लवकरच राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रकल्पास निधी उपलब्ध करण्यात येईल.





