कोपरगाव येथे देशातील पहिला सहकारी सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले..!
कोपरगाव अहिल्यानगर.

आज अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. कोपरगाव येथे देशातील पहिला सहकारी सीएनजी प्रकल्प आणि स्प्रे डायर पोटॅश ग्रन्युअल प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री मा.श्री.अमितजी शाह यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, अहिल्यानगरचे पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन, केंद्रीय राज्य मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपिन कोल्हे व सौ. स्नेहलता कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, “सहकार चळवळीच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल. हा प्रकल्प केवळ कोपरगाव तालुक्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देईल यात शंका नाही. संजीवनी उद्योग समूहाने नव्या कल्पना, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणला आहे”, असे मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.





