महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात बैठक पार पडली..!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात बैठक पार पडली.

यावेळी मंत्री गणेश नाईक, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लवकरच पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणालाही मान्यता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य शासन आणि केंद्र शासनाचाही वेगळा विचार नाही. पूर्वी केंद्र शासनाने ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने परवानगी दिली होती. आता त्याचा नामविस्तार होऊन ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्यात येईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या नामकरणाचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र सरकार सध्या अशा नामकरणासाठी धोरण आखत आहे. या धोरणानुसारच विमानतळाचे नामकरण लवकरच होणार आहे. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव दिले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्यात येतील. या गुन्ह्यांमुळे स्थानिकांना विमानतळावरील नोकरी मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून हे निर्देश देण्यात येतील.

पुणे येथील विद्यमान विमानतळाला ‘जगद्गुरु संत तुकाराम’ यांचे नाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यासाठीचे प्रस्ताव देखील केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!