E-Paperमहाराष्ट्र

अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न..!

ठाणें.

अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्यानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मराठी भाषा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

अमृताहून गोड असलेल्या आपल्या माय मराठी भाषेला गेल्यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. तो दिवस सुवर्णअक्षराने लिहून ठेवण्या सारखा आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. हीच सुवर्ण अक्षरे पुन्हा गिरवण्याची संधी ठाणे शहराला मिळाली याबद्दल मंत्री उदय सामंत यांचे एकनाथ शिंदे यांनी विशेष आभार मानले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. टपाल तिकिटाचे अनावरण, पुस्तकाचे अनावरण, चर्चा, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात होती, आहे आणि कायम राहील असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतला असला, तरीही तो मिळवण्या मागे व्यासपीठावर बसलेल्या सर्व प्रभुतींचे मोठे योगदान आहे. काही मंडळी मतांसाठी मराठीचा वापर करतात, मात्र आमच्यासाठी तो सन्मानाचा विषय असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. शासन म्हणून मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी कधीही निधीची कमतरता भासू देणार नाही असे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.

मराठीतील सर्व बोली भाषांचे जतन, संवर्धन करण्यासाठी आम्ही मराठी भाषा धोरण तयार केले आहे. भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही यावेळी स्पष्ट केले. लंडनला मराठी भाषा भवन बांधण्यासाठी शासनाने ५ कोटी दिले असून त्यामुळे मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार पोहोचला आहे याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव, प्रा.प्रदीप ढवळ सर, डॉ.रविंद्र शोभणे, डॉ.किरण कुलकर्णी, डॉ.ज्ञानेश्वर मुळे, डॉ.मिलिंद जोशी, डॉ.प्रदीप कर्णिक, प्राचार्य अशोक चिटणीस आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!