राजू शेट्टींचा तब्बल 8 तास ठिय्या, अधिकाऱ्यांसह 800 पोलिसांचा फौजफाटा रिकाम्या हातानेच परतला, शक्तीपीठला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागत आहे. माहुली येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी जाण्याची वेळ आली आहे.
Shaktipeeth Expressway Sangli News : शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ आता सांगली जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागत आहे. खानापूर तालुक्यातील माहुली येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांच्या आक्रमक विरोधामुळं मोजणी न करताच रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सकाळी 9 वाजल्यापासून माहुली येथील जमीन मोजणीच्या ठिकाणी शेतकऱ्यांसह तब्बल 8 तास ठिय्या मांडून प्रशासनाची कोंडी केली. यानंतर 800 पोलिसांचा फौजफाटा आणि अधिकारी निघून गेले.
रिसरात काही काळ तणावाचे वातावरण
दिवसभरात उपविभागीय अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अनेकदा मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासनाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर त्यांना नमते घ्यावे लागले. सुपीक जमिनी महामार्गात जात असल्याने नागेवाडी, माहुली आणि भाग्यनगर परिसरातील शेतकरी कमालीचे आक्रमक झाले होते. मोजणीसाठी आलेल्या पथकाकडील मोजणीची यंत्रे संतप्त शेतकऱ्यांनी ताब्यात घेऊन ती जागेवरच फोडून टाकली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख आंदोलकांची धरपकड आणि सुटका मोजणीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी काल रात्रीपासूनच शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करत त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, शेतकऱ्यांचा वाढता दबाव आणि आंदोलन पाहता या सर्व पदाधिकाऱ्यांना सायंकाळी उशिरा सोडून देण्यात आले.
