BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!

BJP-SAD Alliance Punjab Assembly Elections : पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. तब्बल 6 वर्षांनंतर भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
BJP-SAD Alliance Punjab Assembly Elections : पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. तब्बल 6 वर्षांनंतर भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 2027 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष युती करून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पत्रकार परिषद घेत या युतीची अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे, गुरु नानक देव यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला.
या युतीची घोषणा करताना अमित शाह यांनी अकाली दलासोबतच्या जुन्या मैत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “अकाली दल हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. आम्ही यापूर्वी एकत्र अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यात कधी विजय मिळवला, तर कधी पराभवाचा सामना केला. आज हे नाते पुन्हा एकदा जोडले जात आहे, जुन्या मित्राचं स्वागत.”
अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदल्या दिवशी सुखबीर सिंग बादल यांच्याशी संवाद साधला होता. अकाली दलाच्या पुनरागमनामुळे एनडीए पुन्हा पूर्ण झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप आणि अकाली दलाची युती ही हिंदू-शीख ऐक्याचे प्रतीक असल्याचे शाह यांनी नमूद केले.
अमित शाहांनी पंजाबसाठी अजेंडा केला स्पष्ट
युतीची घोषणा करताना अमित शाह यांनी पंजाबमधील प्रमुख प्रश्नांवरही भाष्य केले. राज्यातील अमली पदार्थांचे व्यसन, भ्रष्टाचार आणि राष्ट्रवादी शक्तींना बळकट करण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अमित शाह म्हणाले, “पंजाबमधून अमली पदार्थांचे व्यसन समूळ नष्ट करणे, भ्रष्टाचार संपवणे आणि राष्ट्रवादी शक्तींना बळकट करणे हे आमचे ध्येय आहे. सध्याच्या सरकारने आणि अरविंद केजरीवाल यांनी तीन महिन्यांत पंजाबला अमली पदार्थमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. राहुल गांधी यांनीही 2017 मध्ये असेच आश्वासन दिले होते. आम्ही 31 डिसेंबर 2029 पर्यंत पंजाबला अमली पदार्थमुक्त करण्याचे वचन देतो.”
